पुणे- राहुल बाबा आणि कंपनीने ५५ वर्षे देशावर राज्य केले आणि देश खड्ड्यात घातला. त्यामुळे देशाचा विकास रखडला, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहूल गांधी यांच्यावर केली. ते पुण्यात आयोजित भाजपच्या शक्तिकेंद्र संमेलनप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कॅबिनेट मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
यावेळी अमित शाह म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा लढवू आणि जिंकूही. यावेळी आपल्याला पुणे, बारामती, शिरूर या तिन्ही जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागावे लागणार आहे. आपल्या सरकारचे काम जनतेपर्यंत घेऊन जावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. जर तुम्ही येत्या काळात असे केले, तर २०१९ लोकसभा निवडणूक आपणच जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'एक-एका घुसखोराला शोधून काढू'
भाजपने 'वन रँक, वन पेन्शन' योजना आणली. आता काँग्रेसकडून सांगण्यात आले की, आम्ही ही वन रँक वन पेन्शन योजना आणली होती. मात्र, त्यांची ही योजना जवानांसाठी नव्हती तर 'वन राहुल वन प्रियंका' योजना आहे, असा टोला शाह यांनी लगावला. ते म्हणाले, राहुल बाबा आणि कंपनीने ५५ वर्षे देशावर राज्य केले आणि देश खड्ड्यात घातला. राहुल गांधींना आलू कुठे लागतात, तेही माहिती नाही. त्यांना आकडेमोड जमत नाही. शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याच्या घोषणेवर टीका करतात, असेही शाह म्हणाले. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास देशातील एक-एका घुसखोराला शोधून शोधून बाहेर काढू.
'राम मंदिराबाबत कुठलाही संशय ठेवू नका'
अयोध्येत राममंदिर बनवले जाणारच. याबाबत कुठलाही संशय ठेवण्याची गरज नाही. भाजप अयोध्येत त्याच ठिकाणी राम मंदिर बनवणार, असे आश्वासनही यावेळी शाह यांनी दिले.
दरम्यान, यावेळी भाजपच्या शक्तिकेंद्र संमेलनाला आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. शांततापूर्वक निदर्शन करत दाखवले काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.