वाराणसी- योगी सरकार दिलेली वचने पूर्ण करत आहे. नरेंद्र मोदीजींनी उत्तरप्रदेशसाठी योजना तयार केल्या आहेत. राज्याचा विकास होत आहे. याआधी राज्यात जातीच्या आधारावर निवडणुका जिंकल्या जातात, असे म्हटले जायचे. परंतु, आता विकासाच्या आधारावरच राज्यात निवडणुका जिंकल्या जात आहेत. येथील लोकांनी जातीयवादी राजकारण नाकारले आहे, असे विधान अमित शाह यांनी वाराणसी येथे केले आहे.
वाराणसी येथील जनतेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, उत्तरप्रदेशच्या जनतेने आम्हाला ५० टक्के मतदान केले. राज्याची जनता आमच्या मागे बुरुजाप्रमाणे उभी राहिली आहे. पुढील ५ वर्षात उत्तरप्रदेश सगळ्यात विकसित राज्याचा यादीत अग्रेसर असेल. मोदीजींनी २०१४ साली वडोदरा आणि वाराणसी येथून निवडणूक जिंकली होती. त्यांनी मनात कोणताही विचार न करता वाराणसीतून खासदार होण्याचे ठरवले. २०१४ ते २०१९ या काळात खूप बदल झाले आहेत. आता राज्यात स्वच्छ गंगा, खड्डेमुक्त रस्ते आणि विमानतळे झाली आहेत.