श्रीनगर :देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, जम्मू-काश्मीरच्या शिक्षण विभागाने २१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार, स्वतःच्या जबाबदारीवर काही प्रमाणात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा ५० टक्के कर्मचारी, आणि ५० टक्के विद्यार्थ्यांसह सुरू होतील. केवळ पालकांची लेखी परवानगी मिळाल्यानंतरच एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत उपस्थित राहू दिले जाणार आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
साधारणपणे वर्षभरापासून येथील शाळा बंद आहेत, त्यामुळे आता या सुरू करणे आवश्यक आहे. आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी केवळ ५० टक्के शिक्षक आणि विद्यार्थी दररोज शाळेत उपस्थित राहतील. तसेच, ९वी ते १२वी पर्यंतचे विद्यार्थीही स्वतःच्या इच्छेनुसार ५० टक्के हजेरी नोंदवू शकतात. शाळांचे वेळापत्रक हे त्या-त्या शाळेने ठरवायचे आहे. तसेच, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा निर्णय पालक घेतील. दरम्यान, ऑनलाईन वर्ग हे सध्या सुरू आहेत त्याप्रमाणेच सुरू राहतील असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
कलम ३७० हटवण्याच्या प्रक्रियेवेळी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे काश्मीरमधील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्या मार्चपर्यंत बंदच होत्या. त्यानंतर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्यामुळे काश्मिरातील शाळा सुरुच होऊ शकल्या नाहीत.
हेही वाचा :आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचे नाव बदलले, आता होणार 'छत्रपती शिवाजी महाराज'