नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमध्ये मागील काही महिन्यांपासून सीमावाद सुरू आहे. नियंत्रण रेषेवर लष्करासोबतच चिनी हवाई दलाचाही भारताला धोका निर्माण झाला आहे. चीनचा धोका लक्षात घेता भारताने कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शत्रूची विमाने जमीनदोस्त करण्यासाठी भारताने दहा आकाश क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. विविध प्रसंगात कशा पद्धतीने चिनी विमाने खाली पाडता येतील याची तयारी भारताकडून सुरू आहे.
आंध्रप्रदेशात घेतली चाचणी
आंध्रप्रदेशातील सुर्यलंका क्षेपणास्त्र चाचणी मैदानावर मागील आठवड्यात आकाश मिसाईलची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीरित्या झाली. आकाश क्षेपणास्त्रांनी अचूकपणे आपल्या लक्ष्याचा वेध घेतला. नौदलाने या चाचणीचे आयोजन केले होते. 'कम्बाईन गायडेड वेपन्स फायरिंग २०२०' असे या चाचणीला नाव देण्यात आले होते.
लडाखमध्ये सीमेवर आकाश क्षेपणास्त्र तैनात
आकाश क्षेपणास्त्र आणि खांद्यावर ठेवून डागता येणारे मिसाईल पूर्व लडाख सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. चिनी विमानांचे भारतीय हद्दीतील उल्लंघन रोखण्यासाठी ही शस्त्रे सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. नुकतेच आकाश क्षेपणास्त्र अद्ययावत करण्यात आले आहे. हे देशी बनावटीचे सर्वात यशस्वी क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. अती उंचावरील लक्ष्याला भेदण्याची क्षमताही आकाश क्षेपणास्त्रात आहे.