पणजी - गोवा धूर मुक्त करण्यासाठी येत्या ३१ मेला चौथ्या तंबाखू विरोधी जाहिरात-चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात गोवा आणि राष्ट्रीय विभाग या दोन गटात स्पर्धा घेण्यात येईल. तंबाखूचे हानिकारक परिणाम, तोंडाचा कर्करोग टाळणे, हृदय रोगाचे प्रमाण कमी करण्यासह चित्रपट कलेला प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
तंबाखू विरोधी जाहिरात-चित्रपट महोत्सवाचे पणजीत आयोजन गोवा मनोरंजन संस्था (इएसजी) आणि गोवा सरकारच्या दंत महाविद्यालयातर्फे संयुक्तपणे याचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी इएसजीतर्फे मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा आणि गोवा दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अमिता केंकरे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांच्या हस्ते महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, डोवाल यांनी घेतला आढावा
'हा जाहिरात चित्रपट कोकणी, मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेत असावा. राज्य विभागासाठी त्याचा निर्माता गोमंतकीय व्यक्ती अथवा गोव्यात शिकणारा विद्यार्थी किंवा संस्था असावी. दोन्ही विभागातील जाहिरात चित्रपटाचा कालावधी दोन मिनिटांपेक्षा अधिक नसावा,' अशी नियमावली यावेळी सतिजा यांनी सांगितली. या महोत्सवसाठी पात्र व्यक्ती १० एप्रिलपर्यंत इएसजीच्या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. तरही चित्रपट जाहिरात त्यांनी 15 मेपर्यंत सादर करावी लागेल.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : अमित शाह अॅक्शनमध्ये, 24 तासात घेतल्या तीन बैठका
गोवा विभागासाठी प्रथम बक्षीस 50 हजार, द्वितीय बक्षीस 30 हजार तर तृतीय बक्षीस 20 हजार रुपये असणार आहे. तर राष्ट्रीय स्तरावर प्रथम बक्षीस 1 लाख, द्वितीय 50 हजार आणि तृतीय बक्षीस 30 हजार रुपये, अशी बक्षिसांची रक्कम असणार आहे. या महोत्सवातील पुरस्कार प्राप्त जाहिरात चित्रपटांचा उपयोग चित्रपटगृहे, दूरदर्शन वाहिन्या, शाळा, महाविद्यालय, इतर सरकारी खात्यांचे कार्यक्रम आणि इंटरनेटवर तंबाखू विरोधी अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणार आहे.