नवी दिल्ली -उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. यानंतर या तरुणीला पुढील उपचारासाठी दिल्लीतील सफदरगंज या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणीचा गेल्या आठवड्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय याप्रकरणातील तरुणीची ओळख जाहीर केली. यामुळे कायदेशीरदृष्ट्या अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या, पीडितेवर बलात्कार झाला हे सिद्ध झाल्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि ज्यांनी या तरुणीची ओळख जाहीर केली, त्या सर्वांना नोटिसा पाठवण्यात येईल.
तसेच शर्मा म्हणाल्या, फक्त अमित मालवीयच नव्हे तर, दिग्विजय सिंग, स्वरा भास्कर आणि आणखी इतरांनी हाथरस प्रकरणातील पीडितेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच जंतर मंतरवर जाहीर केली.
अजून पीडितेवर बलात्कार झाला, हे अहवालातून अजून स्पष्ट झालेले नाही. न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली आहे. एकदा या बाबतीत स्पष्टता आल्यावर सर्वांना नोटिसा बजावण्यात येतील, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. तसेच माझ्याजवळ प्रत्येकाने याप्रकरणाशी संबंधित सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टची माहिती आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
2 ऑक्टोबरला मालवीय यांनी पीडितेचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यात, 'हाथरस पीडिता एएमयूच्या बाहेर एका पत्रकाराशी संवाद साधत आहे. त्यात तिने दावा केला की, तिची मान दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला.'