चंदीगड -कैद्यांचे मनोरंजन करण्यासाठी राज्यभरातील तुरुंगात रेडिओ स्टेशन सुरू करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. या रेडिओ स्टेशनचे संचालन कैदीच करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून कैद्यांचे केवळ मनोरंजनच नाही तर त्यांच्यामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे.
कैदीच करणार रेडिओ स्टेशनचे संचालन
मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वातील सरकारने हरियाणाच्या सर्व तुरुंगांमध्ये रेडिओ स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कैद्यांनी कैद्यांसाठी चालवलेले हे रेडिओ स्टेशन असणार आहे. तुरुंगातील प्रमुख कैदी या रेडिओ केंद्रासाठी काम करणार आहेत. हे कैदी रेडिओ केंद्रासाठी रेडिओ जॉकी म्हणून काम करतील. या रेडिओ केंद्रासाठी टिंका टिंका या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
21 कैद्यांना प्रशिक्षण
या रेडिओ स्टेशनसाठी आतापर्यंत पानिपत, अंबाला आणि फरीदाबादमधील 21 कैद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरच या रेडिओ स्टेशनचे काम सुरू होणार असून, हेच कैदी या रेडिओ केंद्रासाठी काम करणार आहेत. यापुढील काळात देखील आणखी काही कैद्यांना रेडिओसाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती 'टिंका टिंका'च्या अध्यक्षा वर्तिका नंदा यांनी ईटीव्ही भारतला बोलताना दिली. दरम्यान या रेडिओच्या माध्यमातून दररोज आरोग्य, संगित, कायदा यासंदर्भातील कार्यक्रम सादर केले जाणार असून, कैद्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळणार आहे.