जोधपूर - राजस्थानमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी १ च्या सुमारास हा अपघात झाला. जैसलमेर-जोधपूर रस्त्यावर हा अपघात झाला. जैसलमेरहून आगोलाईला जाणारी एक मिनी बस आणि आगोलाईहून जैसलमेरला जाणारी बोलेरो गाडी यामध्ये अपघात झाला. अपघातात १३ लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी तीन लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महिला, ९ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आणखी दहा जखमींवर जोधपूरच्या मथुरादास माथुर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच, सहायक पोलीस अधीक्षक रघुनाथ गर्ग हे आपल्या सहकाऱ्यांसह अपघाताच्या ठिकाणी उपस्थित झाले. सोबतच त्यांनी महात्मा गांधी रुग्णालय आणि मथुरादास माथुर रुग्णालयालाही सूचना देऊन ठेवल्या. सध्या अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.