नवी दिल्ली- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या अफलातून 'लाव रे तो व्हिडिओ'च्या अनोख्या सभांमधून मोदी सरकारचं अपयश चव्हाट्यावर आणलं. आता तशाच प्रकारचं अभियान राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सुरू करणार आहे. मोदी सरकारच्या अनेक क्षेत्रातील चुकीच्या निर्णयांमुळं दिल्लीकरांचे कसे हाल होत आहेत हे आप जनतेला दाखवून देणार आहे.
मोदी सरकारच्या लोक विरोधी धोरणांमुळे दिल्लीकरांचे दैनिंदिन जीवन मुश्कील झाले असून ते आम्ही दाखवून देणार आहोत, असे आपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. आप आणि दिल्ली सरकार प्रत्येक क्षेत्रांमधील निर्णय आणि त्याबद्दलची आकडेवारी दररोज माध्यमांपुढे उघड करणार आहेत.
या माध्यमातून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारचे निर्णय यांमध्ये तुलना केली जाणार आहे. यातून केंद्राचे निर्णय कसे सामान्य दिल्लीकरांसाठी चुकीचे होते हे दाखवण्यात येणार आहे. मेट्रो भाडेवाढ, एमसीडीचे दिल्ली स्वच्छ ठेवण्यातील अपयश, वीज दरवाढ, प्रदूषण, जीएसटी, नोटबंदी अशा महतत्वाच्या विषयांवर आप सरकार आकडेवारी जाहीर करणार आहे.
दिल्लीसाठी जाहीरानामा बनवण्यापासून भाजपने आधीच पळ काढला आहे. कारण त्यांनी आधी दिलेली आश्वासने पुर्ण केली नाहीत. जनता त्यांना त्यांच्या आधीच्या आश्वासनांबद्दल प्रश्न विचारेल असे, आप नेत्याने सांगितले. लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात १२ मे ला दिल्लीमध्ये सात मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. तर २३ मे ला निकाल जाहीर होईल.