बंगळुरू- आजच्या युगात काही मुलांनी आपल्या आई-वडिलांना सोडून दिल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण, कर्नाटकातील हुबळी (जि. धारवाड) येथील एक जोडपे गरिबांच्या पोटाची भूक भागवत आहे.
शिरहट्टी परिवार अन्नदान करताना सध्या भारतात अनेकांचा भूकबळी जातो. काही लोकांना घरच्यांनी बाहेर काढलेले असते तर काही स्वतः घरदार सोडून भरकटत असतात तसेच ज्यांची खाण्यापिण्याची परिस्थिती नसते, अशा गोरगरिबांना ते अन्नदान करतात. करेप्पा शिरहट्टी आणि सुनंदा शिरहट्टी, असे या जोडप्याचे नाव आहे.
हुबळीच्या आनंदनगर भागात राहणारे शिरहट्टी दाम्पत्य हे भाकरी विकूण आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना अपत्य नाही आणि राहण्यासाठी स्वतःचे घर देखील नाही. भाकरी विकून आलेल्या पैशातून ते भाड्याच्या घरात राहतात. तसेच आपल्या गरजा भागवितात. शिल्लक पैशांनी ते भूकेजल्यांची भूक भागवितात. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. श्री. निलप्पा गुडप्पा शिरहट्टी सेवा संस्थेच्या नावाने ते हे कार्य करतात.
आपण या जगाचे काही देणे लागतो, या भावनेने ते हे समाजकार्य करतात. त्यांची ही अन्नदानाची चळवळ वाढविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यासाठी ते कोणाचीही मदत न घेता, केवळ भाकरी विकून आलेल्या पैशातूनच सर्वकाही करतात. सध्याच्या युगात, असे समाजोपयोगी कार्य करणे कौतुकास्पदच म्हणावे लागेल.
हेही वाचा - ...म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी भर सभेत ढसाढसा रडले