कोची -केरळमधील कोची येथे एका 12 वर्षीय मुलीने वाचकांसाठी मोफत ग्रंथालय सुरू केले आहे. या ग्रंथालयामध्ये 3 हजार 500 पुस्तक उपलब्ध असून 110 जण या ग्रंथालयाचे सदस्य आहेत.
वाचनाची आवड जोपासण्यासाठी कोची येथील यशोधा शेनॉय या अवघ्या 12 वर्षाच्या मुलीने वाचक प्रेमींसाठी मोफत ग्रंथालय सुरू केले आहे. या ग्रंथालयात 2 हजार 500 पुस्तक ही मल्याळम भाषेत तर 1 हजार पुस्तक ही इंग्रजी भाषेत उपल्बध आहेत. येथे वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे.
सामजिक व सांस्कृतिक जडणघडणीमध्ये ग्रंथालय मोलाचे काम करते. मात्र, गरीब परिस्थिती असलेल्या लोकांसाठी ग्रंथालायाचे सदस्य होणे परवडत नाही. वाचन करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही ही संकल्पना राबवल्याचे यशोधाने सांगितले.
माझ्या वडिलांनी मोफत ग्रंथालयाची कल्पना फेसबूकवर शेअर केली. त्यानंतर त्यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी आम्हाला पुस्तके दान केली. लोकांच्या मदतीनेच हे ग्रंथालय उभारले असल्याचं यशोधा म्हणाली.
ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान असून ग्रंथालयसेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क व राष्ट्राची जबाबदारी आहे.