नवी दिल्ली - लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या टेबलवरून कागदपत्रे हिसकावून घेत, सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दुपारी तीन वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर या सत्राच्या अध्यक्षा मीनाक्षी लेखी यांनी गौरव गोगोई, टी. एन. प्रथापन, डीन कुरियाकोस, आर. उन्नीथान, मनिकाम टागोर, बॅन्नी बेहनन, गुरजीत सिंह अजुलिया यांचा उल्लेख केला. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी सदस्यांना निलंबित करण्याचा ठराव मांडला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या विरोधानंतरही, आवाजी मतदान घेत हा ठराव मंजूर करण्यात आला.