सुकमा -लॉकडाऊनमुळे अनेक मजूर बरोजगार झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या गावाकडे धाव घेत आहेत. आंध्रप्रदेशातून बुधवारी ६ मजूर २५० किलोमीटर पायी चालत छत्तीसगड-आंध्रप्रदेश सीमेवर पोहोचले. त्याठिकाणाहून वाहणाऱ्या शबरी नदीच्या घाटावरील नाव देखील बंद होत्या. तसेच राज्याच्या सीमा देखील बंद आहेत. त्यामुळे त्यांनी नदीमध्ये उडी घेतली.
ओडिशा राज्यातील मलकानगरी येथील ६ जण पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील जंग्गारे ड्डीगुडम येथे गेले होते. ते पॉम ऑयल कंपनीमध्ये काम करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कंपनीचे काम ठप्प झाले. त्यात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आले. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचण भासू लागली. तसेच घरात खायला अन्न देखील नव्हते. त्यामुळे ते जंगलामधून वाट काढत २५० किलोमीटर पायी चालत आंध्रप्रदेश-छत्तीसगड सीमेवर पोहोचले. मात्र, राज्याच्या सीमा बंद होत्या. तसेच त्यांना क्वारंटाईनचीही भीती होती. त्यामुळे त्यांनी शबरी नदीमध्ये उडी घेतली. सहा जणांपैकी ५ मजुरांना पोहता येत असल्याने त्यांनी नदी पार केली. मात्र, एकजण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. त्याच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केले असता स्थानिक मच्छीमारांनी त्याला वाचवले. त्यानंतर त्यांना बोटीने ओडीशा येथे पोहोचवण्यात आले. आता त्यांना ओडीशा येथील मोटू गावामध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.