महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जगातील ४८ देशांकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध, भारताला दिले समर्थन - दहशतवाद

युरोपीयन महासंघासह संयुक्त राष्ट्रसंघाने देखील भारताची पाठराखण केली आहे.

पुलवामा हल्ल्याचे ठिकाण

By

Published : Feb 16, 2019, 2:03 PM IST

नवी दिल्ली- जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरुवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यात ४५ जवानांना हौतात्म्य आले. या हल्ल्याचा निषेध आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जात आहे. जगातील ४८ देशांनी या हल्ल्याचा निषेध करून भारताला समर्थन दर्शवले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने पुलवामा हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. यासंबंधी त्यांनी एक निवेदन जारी केले. यात ते म्हणाले, की आम्ही पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. यात ज्या जवानांनी प्राणार्पण केले त्यांचे कुटुंबीय आणि भारतीयांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. यात जखमी झालेल्यांच्या परिस्थितीत लवकर सुधारणा व्हावी. तसेच, यातील पीडितांना न्याय मिळावा, अशी आम्ही अपेक्षा करतो, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

युरोपीयन युनियननेदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या कठीण क्षणी आम्ही भारतासोबत आहोत. दहशतवादाशी लढण्यासाठी आम्ही भारतासोबत उभे राहू.

अमेरिकेसह इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जर्मनी, कॅनडा, सौदी अरब, अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया, ओमेन, इराण, बहराम, जपान, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका या देशांनी भारतावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. या देशांसह भारताचे शेजारी देश चीन, श्रीलंका, बांगलादेश, नेपाल, मालदीव, भुतान या देशांनी देखील या घटनेचा निषेध करत भारताला समर्थन व्यक्त केले आहे. पाकिस्तानने देखील या घटनेचा निषेध केला असून आम्ही जगात कोठेही होणाऱ्या हिंसेला विरोध करतो, असे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details