नवी दिल्ली - शनिवारी दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांनी ४४५ चा टप्पा गाठला आहे. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, अद्याप याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
दिल्लीमधील एकूण कोरोनाच्या रुग्णांपैकी परदेशातून तसेच निझामुद्दीन मरकज कार्यक्रमातून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. स्थानिक संक्रमण झालेल्या लोकांची संख्या ४० आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मरकजमध्ये सहभागी असणाऱ्या सुमारे २,३०० लोकांची पुढील दोन-तीन दिवसांमध्ये कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्लीमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.