मथुरा - हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. महिला अत्याचाराचे प्रकरण नीट हाताळले नसल्याचे म्हणत काँग्रेससह विरोधी पक्षांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला होता. तर, या घटनेवरून सरकारची बदनामी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून कट आखला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर हाथरसमध्ये जातीय दंगलीचा कट आखल्याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे.
मथुरा पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींकडील मोबाईल, पत्रके, डायरी जप्त केली आहे. अतिकूर रहमान, आलम, सिद्दीकी आणि मसूद अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. रेहमान, आलम आणि मसूद हे राज्यातील अनुक्रमे मुझ्झफनगर, रामपूर आणि बहारिच जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर सिद्दीकी केरळ राज्यातील मल्लपूरम येथील आहे.