हैदराबाद - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती १९ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराजांची ही जयंती स्वराज्याच्या सीमा ज्या भागात विस्तारल्या होत्या त्या-त्या ठिकाणी साजरी केली जाते. त्याचप्रमाणे तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबादमध्येही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही येथील तेलंगणा मराठा मंडळाच्यावतीने शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाणार असून हैदराबाद शहरातील मराठी भाषिक मावळे या जयंतीसाठी सज्ज झाले आहेत.
दरम्यान, शिवजयंती दिवशी हैदराबाद शहरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुचाकी रॅली, पारंपरिक ढोल ताशा पथकांच्या गजरात भव्य मिरवणूकही काढण्यात येणार आहे. शहरातील पुराणापूल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. ही शोभायात्रा पुरानापूल येथून दुपारी एक वाजता सुरू होत पुढे जुमेरात बाजार, चुडी बाजार, बेगम बाजार, मुख्तार गंज, शंकरशेर हॉटेल, बडेमियां पेट्रोल पंप होत शिवाजी पार्क, इमलीबन बस डेपोच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी चार वाजता पोहोचणार आहे. यानिमित्ताने शहरात दिवसभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हैदराबादमधील मराठी भाषिक असलेल्या सर्वच क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान करण्यात येणार आहे.
शिवजयंती निमित्त शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती सजावट करण्यात येणार आहे. शिवजयंती निमित्त सर्व परिसर भगवामय करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे, तर शिवजयंतीनिमित्त येणाऱ्या शिवभक्तांच्या भोजनाचीही सोय तेलंगणा मराठा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. शिवजयंती निमित्त महाराष्ट्रापासून दूर या तेलंगणा राज्यात राहणाऱ्या सर्व शिवप्रेमींसाठी हा उत्सव एक पर्वणीच ठरणार आहे. या दिवशी सातारा, सोलापूर सांगली, हुबळी,बीदर झळकी, लातूर, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे.