कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रातील ३६ मंत्री पहिल्यांदाच करणार जम्मू-काश्मीरचा दौरा - काश्मीर आंदोलन
जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारमधील ३६ मंत्री प्रथमच काश्मीरचा दौरा करणार आहेत.
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारमधील ३६ मंत्री प्रथमच काश्मीर दौरा करणार आहेत. १८ आणि २४ जानेवारी दरम्यान सरकारमधील ३६ मंत्री जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विविध ५९ ठिकाणी भेटी देणार आहेत, अशी माहिती केंद्रिय गृह मंत्रालयाने दिली आहे.
भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणांमध्ये जम्मूतील ५१ तर काश्मीरमधील ८ ठिकाणांचा समावेश आहे. काश्मीर दौरा करणारे मंत्री स्थानिक नागरिकांना केंद्र सरकाने केलेली विकास कामे आणि योजनांची माहिती देणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
केंद्रिय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, रेल्वेमंत्री पियूष गोयल, केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतीक मंत्री महेंद्र नाथ पांडे यांच्यासह माजी सेनाप्रमुख व्ही. के. सिंग हे या मंत्रीगटामध्ये सहभागी आहेत.