महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'...तर १९८४ ची शीख दंगल उसळली नसती', मनमोहन सिंग यांचे मोठे विधान

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984 च्या शीख दंगलीवर मोठे विधान केले आहे.

मनमोहन सिंग
मनमोहन सिंग

By

Published : Dec 5, 2019, 9:24 AM IST

नवी दिल्ली -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984 च्या शीख दंगलीवर मोठे विधान केले आहे. 'तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांनी माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांचा दिल्लीमध्ये सैन्य तैनात करण्याचा सल्ला ऐकला असता, तर शीख दंगल टाळली जाऊ शकली असती', असे वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केले आहे. इंद्र कुमार गुजराल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.


तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकाकडूनच हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर 1984 मध्ये देशभर शिखांच्या विरोधात भडका उडाला. या परिस्थितीवर गुजराल चिंतीत होते. त्यांनी तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांची भेट घेतली होती आणि त्यांना परिस्थिती गंभीर असून सरकारने लवकरात लवकर सैन्य तैनात करावे, असा सल्ला दिला होता. जर नरसिंह राव यांनी गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर शीख दंगल टाळता आली असती, असे मनमोहन सिंग यांनी म्हणाले.


31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यादिवशी रात्रीपासूनच शीखविरोधी हिंसाचारास सुरुवात झाली. त्यानंतर सतत तीन दिवस दिल्ली धगधगत होती. 1 ते 3 नोव्हेंबर या दरम्यान सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त शीख बांधवांची हत्या करण्यात आली होती.


इंद्रकुमार गुजराल यांच्याविषयी...
इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म ४ डिसेंबर १९१९ सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला होता. त्यांनी १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले होते. गुजराल भारताचे ११ वे पंतप्रधान होते. तत्पूर्वी ते दोनदा मंत्री तसेच रशियात राजदूत होते. २९ नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तत्काळ स्थगित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details