महाराष्ट्र

maharashtra

देशभरात कोरोनाचे १६६ रुग्ण; मागील २४ तासात १७ रुग्णांची भर

By

Published : Mar 19, 2020, 7:55 AM IST

Updated : Mar 19, 2020, 10:00 AM IST

भारताबाहेर ज्या देशांमध्ये कोरोना जास्त प्रसार झाला आहे, तेथे तब्बल २७६ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा भारतात संसर्ग झालेल्यांपेक्षा जास्त आहे.

कोरोना संग्रहित छायाचित्र
कोरोना संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील कोरोना रुग्णांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत १६६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १४१ भारतीय आणि २५ परदेशी नागरिकांना लागण झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येक एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेलंगाणामध्ये ६ तर चंदीगडमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची यादी

महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे ४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याखालोखाल केरळ, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकात अनुक्रमे २७, १७ आणि १४ जणांना लागण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये १२ तर लडाख केंद्रशासित प्रदेशात ८ जणांना बाधा झाली आहे. इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वांवर उपचार सुरू आहेत. राजस्थानातही सात जणांना बाधा झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर अनेक देशांतून भारतात येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली आहे. चीननंतर युरोपात कोरोनाने थैमान घातले आहे. इटलीमध्ये सर्वात जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून मृत्यू दर वाढला आहे.

भारताबाहेर २७५ जणांना कोरोनाची लागण

भारताबाहेर ज्या देशांमध्ये कोरोना जास्त प्रसार झाला आहे, तेथे तब्बल २७६ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा भारतात संसर्ग झालेल्यांपेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त २५५ रुग्ण इराणमध्ये आहेत. तर संयुक्त अरब अमिरातमध्ये(युएई) १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीत ५ तर हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेत प्रत्येकी १ रुग्ण आहे. या सर्वांवर तेथे उपचार सुरू आहेत.

जगभरात १,८४,००० हून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सात हजारांहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे ८० हजार लोक यातून बरेही झाले आहेत.

Last Updated : Mar 19, 2020, 10:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details