महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मूत गेल्या ५ महिन्यात १०१ दहशतवाद्यांना कंठस्नान, तर ५० नवीन तरुण दहशतवादी संघटनांमध्ये भरती

दहशतवाद्यांविरूद्ध लष्कराने केलेल्या कारवायांनाही स्थानिकांकडून विरोध होत आहे. लष्करावर दगडफेक करण्याचे प्रमाण वाढत आहे.

जम्मूत गेल्या ५ महिन्यात १०१ दहशतवाद्यांना कंठस्नान

By

Published : Jun 2, 2019, 8:07 PM IST

Updated : Jun 2, 2019, 8:34 PM IST

श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ५ महिन्यात २३ विदेशींसह १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. असे असले तरी दहशतवादी संघटनांमध्ये भरती होणाऱ्या नवीन तरूणांची वाढती संख्या लष्करासमोरील मोठी समस्या ठरत आहे. गेल्या ५ महिन्यात तब्बल ५० तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले आहेत.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या मार्च महिन्या अखेरपर्यंत ५० तरुण विविध दहशतवादी संघटनांमध्ये भरती झाले आहेत. या तरुणांपर्यंत दहशतवादी संघटनांचे साहित्य पोहचू न देण्याचे आव्हान भारतीय लष्करापुढे आहे. २०१९ च्या मे महिन्याअखेरपर्यंत १०१ दहशतवादी मारले गेले. त्यात २३ विदेशी होते तर ७८ दहशतवादी स्थानिक रहिवासी होते. यामध्ये अल-कायदाची सहयोगी संघटना अंसार-घजवत-उल-हिंदचा म्होरक्या जाकीर मुसाचाही समावेश आहे.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेतून अंसार-घजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनेत होण्याचे प्रमाण वाढत आहे. २३ मे रोजी जाकीर मुसा याच्या मृत्यूनंतर हा प्रकार वाढीस लागला. दक्षिण काश्मीरमधून तरुण जास्तीत जास्त दहशतवादी संघटनांमध्ये भरती होत आहे. काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सिमेवरून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सुरक्षा दलांनी चिंता व्यक्त केली आहे.

दहशतवादासोबत लढण्यासाठी लष्कराला नवीन रणनिती तयार करण्याची गरज असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तरुणांमध्ये दहशतवादी कारवायांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती करण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या आई-वडिलांसोबत चर्चा करण्यावर भर द्यावा लागेल. आतापर्यंत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये सर्वाधिक संख्या शोपियां जिल्ह्यातील आहे. त्यानंतर पुलवामा, अवंतीपुरा, आणि कुलगाम जिल्ह्यातील दहशतवादी सर्वाधिक मारले गेले आहेत.

दहशतवाद्यांविरूद्ध लष्कराने केलेल्या कारवायांनाही स्थानिकांकडून विरोध होत आहे. लष्करावर दगडफेक करण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेतही मोठ्या संख्येने स्थानिक भाग घेत आहेत. त्यामुळे दहशतवादाविरुद्ध मोहिमा राबवण्यास लष्कराला अडचणी येत आहेत.

Last Updated : Jun 2, 2019, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details