हैदराबाद - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेकने 'कोव्हॅक्सिन' ही कोरोनावरील लस तयार असून भारत बायोटकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला आहेत. कृष्णा एल्ला यांचे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनाशी अतिशय जवळचे नाते आहे.
जगभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता, कृष्णा एल्ला यांच्याकडून आनंदवनाला 4 हजार 'कोव्हॅक्सिन' लस पुरवण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाशी आणि तेथील प्रध्यापकांशी कृष्णा एल्ला यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी.चे शिक्षण घेतले होते.
काय आहे आनंदवन?
बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटले आहेत. आनंदवन केंद्र केवळ कुष्ठरोग्यांनाच नव्हे तर अर्धांगवायू, वृद्ध, अनाथ, विधवा आणि बेरोजगारांनाही निवारा देतो. महाआरोगी सेवा समिती संस्थेतून शिक्षण घेतलेले डॉ. कृष्णा एल्ला संस्थेच्या सदस्यांना लसी देण्यास पुढे आले, याबद्दल मला आनंद झाला, असे बाबा आमटे यांचे नातू कस्तुबा आमटे म्हणाले. तसेच त्यांनी लस पुरवल्याबद्दल कृष्णा एल्ला यांचे आभार मानले. 1948 साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरु केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रुपांतरीत झाला आहे. आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य एवढीच ओळख जनमानसात आहे. प्रत्यक्षात अंध-अपंग, कर्णबधिर, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी अशा उपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारे मॉडेल आनंदवन आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी -
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत आहे. राज्यात शनिवारी नविन 8912 कोरोना रुग्णांची भर पडली असून 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी 10373 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 132597 सक्रिय रुग्ण असून 5710356 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.76 टक्के एवढे झाले आहे.