लव्ह जिहादच्या विरोधातच फतवा.. बरेली (उत्तरप्रदेश): जिल्ह्यातील दर्गा आला हजरतशी संबंधित चशम-ए-दारुल इफ्ता या संघटनेने लव्ह जिहादवर फतवा जारी केला आहे. यामध्ये मुस्लीम समाजातील तरुणांनी बांगड्या घालणे, लाल दोरा बांधणे, कपाळावर टिका लावून ओळख लपवून अन्य धर्मातील मुलींच्या प्रेमात पडणे हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. बाराबंकीचे डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रविवारी हा फतवा काढण्यात आला.
फतव्यात सर्व प्रश्नांची उत्तरे:लव्ह जिहादची प्रकरणे देशात सातत्याने समोर येत आहेत. मुस्लीम संघटना आणि मुस्लीम समाजाशी संबंधित लोक याबाबत सातत्याने प्रश्न विचारत आहेत. बरेलीच्या चशम-ए-दारुल इफ्ताने याबाबत फतवा काढला आहे. यामध्ये या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बरेलीच्या दर्गाह आला हजरतशी संबंधित असलेल्या ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनीही रविवारी याबाबत माध्यमांशी संवाद साधला.
बिगर मुस्लिम मुलींच्या प्रेमात पडणे निषिद्ध:बाराबंकी येथील रहिवासी असलेल्या डॉ. मोहम्मद नदीमने चशम-ए-दारुल इफ्ताला लव्ह जिहादशी संबंधित अनेक प्रश्न विचारले होते. या प्रश्नाच्या उत्तरात फतवा काढण्यात आला. यामध्ये मुस्लिम समाजातील तरुणांना बिगर मुस्लिम मुलींच्या प्रेमात पडणे निषिद्ध असल्याचे म्हटले आहे. याशिवाय हातात काडा घालणे, लाल धाग्याचा कलवा बांधणे, कपाळावर टिका लावणे, बिगर मुस्लिम मुलींशी ओळख लपवून सोशल मीडियावर बोलणे, बिगर इस्लाम धर्म स्वीकारणे, बिगर मुस्लिम मुलींशी विवाह करणे इ. सुद्धा हराम असल्याचे म्हटले आहे.
मुस्लिम समाजाची होतेय बदनामी:राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन म्हणाले की, लव्ह जिहादची प्रकरणे समोर आल्यानंतर मुस्लिम समाजाची बदनामी होते. इस्लाममध्ये हे सर्व चुकीचे आहे. अशा तरुणांना योग्य मार्ग दाखवण्याचा फतवा काढण्यात आला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, मुस्लिम तरुण सोशल मीडियावर आपली इस्लामिक नावे लपवतात, मुस्लिमेतर नावे ठेवतात, तरीही इस्लाम त्यांना असे कोणतेही कृत्य टाळून पश्चात्ताप करण्याची सूचना देतो. जर कोणताही मुस्लिम मुलगा अशा कोणत्याही कृत्यात सहभागी झाला असेल किंवा त्याच्या हेतू आणि विश्वासात दोष असेल तर त्याने वेळीच पश्चात्ताप केला पाहिजे.
हेही वाचा: Migrant Labourers Attack: तामिळनाडू पोलिसांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर दाखल केला गुन्हा, अन्नामलाई म्हणाले, 'हिम्मत असेल तर अटक करून दाखवा'