महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आजही 'या' गावातील लोकं गोगलगाय खाऊन जगतात जीवन; पाहा व्हिडिओ

बिहारच्या दरभंगा (Darbhanga) जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर दरभंगा-सहरसा जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेल्या कुबोल मुसहार टोळीची (Musahar community) अवस्था अतिशय बिकट आहे. येथील लोकं अजूनही गोगलगायी खाऊन जगत आहेत. (Survive by eating snails in Kubol Musahar community).

Kubol Musahar community
Kubol Musahar community

By

Published : Oct 9, 2022, 3:35 PM IST

Updated : Oct 9, 2022, 4:01 PM IST

दरभंगा:बिहारच्या दरभंगा (Darbhanga) जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर दरभंगा-सहरसा जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेल्या कुबोल मुसहार टोळीची (Musahar community) अवस्था अतिशय बिकट आहे. येथील लोकं अजूनही गोगलगायी खाऊन जगत आहेत. (Survive by eating snails in). ही टोळी किरतपूर ब्लॉकच्या कोशी नदीच्या काठावर वसलेली आहे, जी सध्या स्वतःच्या संघर्षाची कहाणी सांगत आहे. येथे गरीबी आणि असहायतेची स्थिती अशी आहे की, या लोकांकडे ना पक्के घर आहे, ना शौचालय. आजही या गावातील महिला व पुरुष उघड्यावर शौच करतात. इथे राहणाऱ्या मुलांना शिक्षण तर दूरच, अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही नाहीत. या समाजातील बहुसंख्य पुरुष परराज्यात काम करतात आणि आजही स्त्रिया कंबरेभर पाण्यात जाऊन गोगलगायी पकडून आणतात आणि त्याचा स्वयंपाक करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

Kubol Musahar community

खायला नाही पुरेसे अन्न: देशात सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अन्नसुरक्षेची हमी असूनही, मुसहार जातीचे लोक अजूनही गोगलगाय, पाण्यात वाढणारे कर्मी आणि उंदीर खाऊन आपली भूक भागवतात. दोन्ही वेळेचं अन्न न मिळाल्याने येथील मुलेही कुपोषित आहेत. यावरून त्यांचा शारीरिक विकास कसा झाला असेल याचा अंदाज बांधता येतो. आपल्या मुलांसाठी अन्न शिजविणारी मुन्नी देवी म्हणाली की, आम्ही वर्षातील ६ महिने पाण्याने वेढलेले असतो. पैशांच्या कमतरतेमुळे आम्ही डाळी आणि हिरव्या भाज्या विकत घेण्यास असमर्थ आहोत. आजपर्यंत आम्हाला शासनस्तरावर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कर्मीची पाने तोडून त्यांना शिजवून आम्ही पोट भरतो.

Kubol Musahar community

कुबोल मुसहार टोळीची अवस्था:सुमारे दीडशे कुटुंबांच्या या गावात ना शौचालय आहे ना एक पक्के घर. या संदर्भात कमलू सडा यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले, "आमच्या गावातील 17 लोकांना खूप पूर्वी घरकुल योजनेचा लाभ मिळाला होता. त्यावेळी शासनाकडून घर बांधण्यासाठी 25 हजार मिळायचे. भर उन्हात खूप धावपळ केल्यावर हातात फक्त 10 हजार रुपये आले. त्यामुळे घर बांधता आले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सरकारद्वारे ही टोळी ओडीएफ (शौचमुक्त) घोषित करण्यात आली आहे.

Kubol Musahar community

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा: मुलांसोबत बसलेल्या तारा देवी म्हणाल्या की, जवळपास शाळा नसल्यामुळे मुलांना अभ्यासासाठी शाळेत जाता येत नाही. त्यामुळे आजही समाजात शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे. तारा देवी म्हणाल्या, "येथून रुग्णालय चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. तिथे गेल्यावरही आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही. दवाखान्यात काही औषध देऊन डॉक्टर इतर औषध बाहेरून घ्यायला सांगतात. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते उपचार करून घेऊ शकतात, मात्र ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे त्यांचे आरोग्य देवाच्या भरवशावर आहे''. आरोग्याबाबत गावातील तरुण सुनील कुमार म्हणाले की, अपुऱ्या आरोग्य सुविधा ही येथील सर्वात मोठी समस्या आहे. किरतपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाऊनही आम्हाला योग्य उपचार मिळत नाहीत. औषधाच्या कमतरतेमुळे पोटदुखी आणि डोकेदुखीवर एकच औषध दिले जाते. तसेच येथे सर्वात मोठी समस्या गर्भवती महिलांची आहे. योग्य सुविधा नसल्यामुळे त्यांना खाटेवर रुग्णालयात नेले जाते. वेळेवर न पोहोचल्यास आई किंवा मुलापैकी एकाचा मृत्यू हमखास होतो.

Kubol Musahar community

कमाईशिवाय रोजगार ठप्प: सामाजिक कार्यकर्ते रमण कुमार म्हणतात की, येथील सर्वात मोठी समस्या गरिबी आहे. ज्याचे मुख्य कारण म्हणजे येथे असलेला रोजगाराचा अभाव. त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्नही मोठा आहे. पूर्वी येथे मृत्यूचे प्रमाण खूप जास्त होते. मात्र सामाजिक जाणिवेमुळे सध्या त्यात घट झाली आहे. येथे रोजगाराची मोठी समस्या आहे आणि येथील 90% लोक इतर राज्यांमध्ये जाऊन आपला उदरनिर्वाह करतात.

Kubol Musahar community

काय म्हणतात अधिकारी:या संदर्भात बिरौळचे उपविभागीय अधिकारी संजीव कुमार यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, कुबोल मुसहार टोळ्यांमध्ये अनेक शासकीय योजना चालवल्या जात आहेत. आमची इच्छा आहे की या लोकांना सरकारी नोकऱ्या आणि सरकारी योजनांचा लाभ मिळावा. त्याच अनुषंगाने तेथे कम्युनिटी हॉल बांधण्यात आला आहे. प्रत्येकाची शिधापत्रिका बनवली गेली आहे. याचा फायदा शंभर टक्के लोक घेत आहेत. जोपर्यंत गृहनिर्माण योजनेचा सवाल आहे, तेथे सर्व लोकांना त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. मात्र कुटुंबाची ओळख पटवून भविष्यात घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल. गावात ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्यात आला आहे. शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी गावात अंगणवाडी तसेच पंचायतीची प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु केली आहे, मात्र मुलांची उपस्थिती कमी असते. यासाठी तेथे जनजागृती करून मुलांची उपस्थिती वाढविण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे संजीव कुमार शेवटी म्हणाले.

ओळख आणि सन्मानाचे भुकेले मुसहार: समाज जीवन व्यवस्थित करण्याचे लाख दावे सरकार करत असले तरी आजही आपल्यात अशा काही जाती आहेत, ज्यांचे जीवन अजूनही नरकमय आहे. या जातीपैकी 'मुसहार' ही एक जमात आहे. हे लोकं महादलित समुदायाचे आहेत. या भागाच्या विकासाचे सरकार कितीही दावे करत असले तरीही ह्या लोकांचे जीवन आजही अतीव संघर्षाचे आहे. जगण्यासाठी त्यांना जास्त काही नाही, केवळ समाजात एक ओळख आणि पुरेसा सन्मान हवा आहे.

Last Updated : Oct 9, 2022, 4:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details