बाडमेर (राजस्थान) :प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव गुरुवारी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजस्थानच्या बाडमेरला पोहोचले होते. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना बाबा रामदेव यांनी एका विशिष्ट धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. धर्मपुरी महाराज मंदिर आणि जगरामपुरी महाराजांच्या अभिषेकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाबा रामदेव आले होते. यावेळी त्यांनी सनातन धर्माचे गुणगान करण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्याचेही कौतुक केले.
नमाज अदा करा, मग मनात येईल ते करा :धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, समाजात सगळीकडे पाप वाढत आहे. हे पाप पुसण्याचे काम मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना करावे लागणार आहे. एका विशिष्ट धर्मावर भाष्य करताना ते म्हणाले की, जर तुम्ही कोणत्याही मुस्लिमाला त्याचा धर्म काय म्हणतो असे विचाराल तर तो म्हणेल की दिवसातून ५ वेळा नमाज पठण करा आणि मग तुमच्या मनात येईल ते करा. म्हणजेच पाहिजे तितके पाप करा. त्यांना इस्लामचा अर्थ फक्त नमाज म्हणून समजतो. ते म्हणाले की मुस्लिम न चुकता नमाज अदा करतात कारण त्यांना तेच शिकवले जाते. पण हिंदू धर्मात हे शिकवले जात नाही.
असा स्वर्ग नरकापेक्षाही वाईट : बाबा रामदेव यांनी ख्रिश्चन धर्मावरही भाष्य केले. ते म्हणाले की, चर्चमध्ये जायचे, मेणबत्त्या लावायच्या आणि मग येशू ख्रिस्तासमोर उभे राहायचे, सर्व पापे नष्ट होतील. धर्मावर भाष्य करताना ते म्हणाले की, मुस्लिमांसाठी स्वर्गाचा अर्थ फक्त पायजमा घालणे आणि मिशा कापून टोपी घालणे असा आहे. हे लोक म्हणतात की असे केल्याने स्वर्गात तुमचे स्थान निश्चित होईल. असा स्वर्ग नरकापेक्षा वाईट आहे. पण तरीही हे लोक मिशा कापतात, डोक्यावर टोप्या घालतात, हा निव्वळ वेडेपणा आहे. ते संपूर्ण जगाला इस्लाममध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.