वाराणसीच्या काशीपूर भागात लालू वर्मा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी खास भांडी बनवत आहेत वाराणसी Ayodhya Ram Mandir Inauguration :अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच लागलीय. त्यातच हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. तसंच श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणाहून शाळीग्राम निवडण्यात आले आहेत. तसंच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वाराणसीच्या काशीपूर भागात पूजेची भांडी तयार केली जात आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीची तयारी : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी पितळ, चांदी, तांबे आणि जर्मनपासून बनवलेली भांडी तयार केली जात आहेत. वाराणसीच्या काशीपूर येथे राहणारे लालू वर्मा यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीसाठी महत्त्वाची भांडी तयार करण्याची ऑर्डर मिळालीय. यामध्ये पाण्याचं पात्र, कमंडल, पूजा थाळी आणि शृंगी यांचा समावेश आहे. लालूंना 121 पीस सेटची ऑर्डर देण्यात आलीय. या तयारीसाठी ते रात्रंदिवस मेहनत करत आहेत.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो :यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना लालू वर्मा म्हणाले की, आम्हावा पितळी कमंडल, जर्मन-चांदीचं आचमन, जर्मन-चांदीची शृंगी आणि जर्मन-चांदीची ताष्टा (पूजा थाळी) तयार करण्याची ऑर्डर मिळालीय. यासाठी आम्ही मागील 15 दिवसांपासून मेहनत घेतोय. 15 तारखेपूर्वी या सर्व गोष्टी तयार करून द्याव्या लागतील. तसंच 35 वर्षांपासून मी हे काम करतोय. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला ही संधी मिळाली.
एक सेटची किंमत 1250 रुपये :पुढं ते म्हणाले की, मला विश्वास बसत नाही की माझ्या डोळ्यासमोर राम मंदिर बांधलं गेलं. त्यात रामलल्ला विराजमान होणार आहेत. हे काम करण्याचं सौभाग्य मला मिळालंय. ब्राह्मणांसाठी पाण्याची भांडे आणि इतर भांडी तयार केल्यानंतर श्री रामांसाठी चांदीची शृंगी देण्यात येणार आहे. तसंच या एका सेटची किंमत 1250 रुपये असल्याचंही लालू वर्मा यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -
- पुण्यात विणलं गेलंय रामलल्लाचं वस्त्र! 'दो धागे श्रीराम के लिये' उपक्रमाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद
- राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठापना सोहळा : पुण्यातील गौरव देशपांडे यांच्या मुहूर्तानुसार होणार राम लल्लांची प्राण प्रतिष्ठापना
- राममंदिर उद्घाटनासाठी 'रामायणा'त लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्याचा मंदिर समितीला विसर