अयोध्या Ayodhya Under Unprecedented Security : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी अयोध्येची सुरक्षा वाढवण्यात आलीय. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्तर प्रदेशचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कमांडो तैनात करण्यात आले आहेत. 22 जानेवारीला होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन लक्षात घेऊन शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. सुरक्षेत कुठलीही कुचराई होऊ नये, यासाठी पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त असून एटीएस कमांडोही तैनात करण्यात आले आहेत.
अयोध्येचं अभेद्य किल्ल्यात रुपांतर : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच अयोध्या शहराचे सुरक्षेच्या आघाडीवर अभेद्य किल्ल्यात रुपांतर झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात सुमारे 8000 व्हीआयपी पाहुणे असतील. त्यामुळंच आकाशापासून जमिनीपर्यंत कडक निगराणी आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. तसंच ड्रोनद्वारे सुरक्षेचं निरीक्षण केलं जाईल. यासोबतच 10 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहे. सीसीटीव्ही प्रत्येक कानाकोपऱ्यावर नजर ठेवणार आहेत. ड्रोन आणि सीसीटीव्ही व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) ते दहशतवादविरोधी पथक (ATS) पर्यंतचे विशेष कमांडो तैनात केले जाणार आहेत.
सुरक्षेचे सात स्तर : प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाच्या चोख सुरक्षेसाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी मिळून 7 स्तरांची सुरक्षा व्यवस्था तयार केलीय. पहिल्या स्तरामध्ये एसपीजी कमांडो असतील आणि त्यांच्या हातात आधुनिक शस्त्रे असतील. दुसऱ्या स्तरामध्ये एनएसजीचे जवान असतील. तिसऱ्या स्तरामध्ये आयपीएस अधिकारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील. चौथ्या स्तराची जबाबदारी सीआरपीएफ जवानांवर असेल. पाचव्या स्तरामध्ये यूपी एटीएसचे कमांडो असतील जे कोणत्याही संशयास्पद परिस्थितीत कारवाई करण्यास सज्ज असतील. सहाव्या स्तरामध्ये आयबीचे जवान तर सातव्या स्तरामध्ये स्थानिक पोलीस तैनात असतील.
देशातील दिग्गज सेलिब्रिटींचा समावेश :प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींचा सहभाग असणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवतही सहभागी होणार आहेत. याशिवाय देश-विदेशातील सेलिब्रिटी मोठ्या संख्येनं सहभागी होण्यासाठी येत आहेत. निमंत्रित पाहुण्यांव्यतिरिक्त लाखो सामान्य लोकही त्यादिवशी अयोध्येला पोहोचणार आहेत.
हेही वाचा :
- मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात होऊ शकतो बदल, आता 'या' दिवशी जाणार अयोध्येला
- अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही होणार वापर; कशी असेल सुरक्षा व्यवस्था