नवी दिल्ली - आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त ( Hemanta Biswa Sarma on Rahul Gandhi ) वक्तव्य केले आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 'राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. आम्ही त्यांच्याकडे तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा कधी मागितला आहे का?' असे विचारत राहुल गांधींवर टीका करताना त्यांनी पातळी सोडली. उत्तराखंडमध्ये 14 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत ते बोलते होते.
हेमंत बिस्वा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबई युथ काँग्रेसने आंदोलन छेडले असून मुंबई काँग्रेस कार्यालय इथे झीशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अनेक राजकारण्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर अनेक नेत्यांनी हिमंता बिस्वा सरमा यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या विधानाच्या निषेधार्थ भारतीय युवक काँग्रेसने शनिवारी आसाम भवनाबाहेर आंदोलन केले. तसेच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हेमंता बिस्वा शर्मा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मानसिक संतुलनातून असली बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यांच्या वक्तव्यातून हेमंता बिस्वा शर्मा यांची घाणेरडी विचारसरणीच दिसून येते असे सुरजेवालांनी म्हटलं.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे असभ्य विधान आहे. त्यांचे वक्तव्य हे भाजपच्या स्त्रीविरोधी विचारसरणीचे प्रतीक आहे. हा प्रत्येक आईचा अपमान आहे. हे दुर्दैवी! अत्यंत निंदनीय. असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.