गुवाहाटी Assam CM Tweet : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'X' वरील त्यांच्या एका हटवलेल्या पोस्टबद्दल माफी मागितली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणं हे शूद्रांचं नैसर्गिक कर्तव्य असल्याचं लिहिलं होतं. या पोस्टवरून बराच वाद निर्माण झाला होता.
हिमंता बिस्वांनी माफी मागितली : या वादानंतर हिमंता यांनी गुरुवारी माफी मागितली. गीतेच्या या श्लोकाचा अनुवाद चुकीचा झाला होता असं त्यांनी सांगितलं. चूक लक्षात येताच मी लगेच पोस्ट काढून टाकली, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की, या पोस्टमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. हिमंता बिस्वा सरमा दररोज सकाळी गीतेचा एक श्लोक त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड करत आहेत. आतापर्यंत त्यांनी ६६८ श्लोक पोस्ट केलेत. ते म्हणाले की, "अलीकडेच त्यांच्या टीममधील एका सदस्यानं १८ व्या अध्यायातील ४४ वा श्लोक चुकीच्या भाषांतरासह पोस्ट केला होता. तो माझ्या लक्षात येताच मी लगेच काढून टाकला".
ओवेसींची कडाडून टीका : या पोस्टनंतर, एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी हिमंता बिस्वा यांना कोंडीत पकडत 'X' वर पोस्ट केलं. ओवेसी म्हणाले की, "हिंदुत्व स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्यायाच्या विरुद्ध आहे. गेल्या काही वर्षांत आसाममधील मुस्लिमांनी ज्या दुर्दैवी क्रौर्याचा सामना केला, ते यावरून दिसून येतं", असा हल्लाबोल त्यांनी केला.
पवन खेडांचा सवाल : काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही यावरून हिमंता बिस्वा सरमांवर हल्ला चढवला. "हिमंता बिस्वा यांच्या जातीयवादी टिप्पण्यांशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती सहमत आहेत का?" असा सवाल त्यांनी केला. "अशा मूर्ख टिप्पण्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान ऑफिस हिमंता बिस्वा सरमा यांच्या जातीवादी टिप्पणीशी सहमत आहे का?" असं पवन खेडा म्हणाले.
हे वाचलंत का :
- केंद्र सरकारनं 'द वॉशिंग्टन पोस्ट'चा 'तो' दावा फेटाळला, केंद्रीय मंत्री म्हणाले 'भयानक'
- I.N.D.I.A, NDA मध्ये विचारधारेची लढाई, भाजपा गुलामगिरीवर चालणारा पक्ष - राहुल गांधी
- कर्नाटकात दुकानांवर दिसणार कन्नड भाषेचे फलक, सिद्धरामय्या सरकारचा निर्णय