हांगझोऊ Asian Games 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केलीय. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा दणदणीत पराभव करत भारतीय महिला संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करत पदक निश्चित केलंय. भारताच्या गोलंदाजंनी बांगलादेशला अवघ्या ५१ धावांत रोखल्यानंतर भारतीय संघानं हे आव्हान आठ विकेट आणि १२ षटकं राखून सहज पार केलंय.
पहिल्या षटकात बांगलादेशचे दोन फलंदाज बाद :बांगलादेशची कर्णधार नायगर सुल्ताना हिनं नॉकआऊट सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या भेदक माऱ्यापुढं बांगलादेशच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. बांगलादेशचा संपूर्ण संघ १७.५ षटकांत अवघ्या ५१ धावांत तंबूत परतला. कर्णधार सुल्ताना वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या देखील पार करता आली नाही. सुल्ताना हिनं सर्वाधिक 12 धावांची खेळी केली. सामन्याच्या पहिल्याचं चेंडूवर पूजा वस्त्राकरनं बांगलादेशला धक्का दिला. पूजानं पहिल्या षटकात बांगलादेशच्या दोन फलंदाजांना माघारी धाडत भारताला दमदार सुरुवात करुन किली. या धक्क्यातून बांगलादेशचा संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही. बांगलादेशच्या सलामी जोडीला एकही धाव काढता आली नाही. सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. शोबाना हिने आठ धावांची खेळी केली. शोरना अख्तरला खातेही उघडता आले नाही. खातुन तीन, तर एन. अख्तर नऊ धावांवर बाद झाली.
पुजाच्या 4 विकेट्स : भारताकडून पूजा वस्तारकरनं चार गडी बाद करत बांगलादेशचं कंबरडं मोडलं. पूजानं चार षटकात अवघ्या १७ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. तर तितास संधूनं चार षटकात दहा धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. अमनजीत कौरनंही तीन षटकात दहा धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. राजेश्वरी गायकवाडनं चार षटकात आठ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. देविका वैद्यनं एक षटक निर्धाव टाकत एक विकेट घेतली. दिप्ती शर्माची विकेटची पाटी मात्र कोरीच राहिली.
आठ गडी राखून विजय :बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी धावांची गतीही वाढवली. पण १९ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार स्मृती मंधाना सात धावांवर झेलबाद झाली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि जेमिमा यांनी भाराताचा डाव सावरत भारताचा विजय दृष्टीक्षेपात आणला. पण त्याचवेळी विजयाला अवघ्या 12 धावांची गरज असतांने शेफाली वर्मा आक्रमक फटका मारण्याच्या नादांत १६ धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमाने नाबाद २० धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि पाकीस्तान यांच्यात होणार असून यातील विजेता संघ अंतिम सामन्यात भारतासोबत दोन हात करेल.
हेही वाचा :
- 19th Hangzhou Asian Games : अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंना चीनचा मज्जाव का?
- Asian Champions Trophy: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ, जय शाह यांनी केले अभिनंदन
- Sports Minister Cancel China Visit : अरुणाचलच्या खेळाडूंना चीननं नाकारला व्हिसा; क्रीडा मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय