नवी दिल्ली :दारू घोटाळ्यात सीबीआयने समन्स बजावलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही तासांनंतर अधिकाऱ्यांसमोर हजर होणार आहेत. सीबीआयने त्यांना नोटीस बजावली असून रविवारी सकाळी 11 वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते आपल्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स येथील निवासस्थानी जमणार आहेत, त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील दिल्लीत तळ ठोकून आहेत. ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी येथे पोहोचतील आणि त्यांच्यासोबत सीबीआय मुख्यालयात जातील. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल जेव्हा सीबीआय मुख्यालयाकडे रवाना होतील तेव्हा त्यांच्यासोबत पक्षाचे सर्व खासदार, दिल्ली सरकारचे कॅबिनेट मंत्री, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, आतिशी, राजकुमार आनंद, इमाम हुसैन आणि गोपाल राय असतील.
जगात कोणीही प्रामाणिक नाही : सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी प्रकरणात चौकशीसाठी नोटीस दिल्यापासून आम आदमी पक्ष भाजपवर आक्रमक झाला आहे. पक्षाचे नेते संजय सिंह, सौरभ भारद्वाज, आतिशी आणि राघव चढ्ढा यांनी एकापाठोपाठ एक पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा एकही कार्यकर्ता घाबरलेला नाही किंवा झुकणार नाही, असे सांगितले आहे. शनिवारी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही प्रसारमाध्यमांना संबोधित करत आपली बाजू मांडली. केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात कोणीही प्रामाणिक नाही, असेही शेवटी त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सीबीआय आणि ईडी जवळपास वर्षभरापासून दारू घोटाळ्याची चौकशी करत आहेत. आतापर्यंत पैसे आणि पुरावे मिळायला हवे होते, पण ते काही मिळाले नाही. 100 कोटी रुपयांची लाच घेतली आणि दिली गेली, जी गोवा निवडणुकीत वापरली गेली, असा त्यांचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी गोव्यात जाऊन सर्व तपास केला, मात्र तेथेही काहीही सापडले नाही, मग शंभर कोटी रुपये कुठे गेले? सीएम केजरीवाल म्हणाले, जिथे घोटाळा झाला नाही, तिथे लोकांना धमकावून स्टेटमेंट लिहून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम आदमी पक्ष हा देशातील जनतेसाठी एक नवी आशा बनून उदयास आला आहे. पंतप्रधान आणि भाजपला हे पचनी पडत नसल्याचा आरोप त्यांनी केला.