अयोध्या Ayodhya Ram temple : रामजन्मभूमी संकुलाच्या स्थायी सुरक्षा समितीची बैठक मंगळवारी सायंकाळी अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलात पार पडली. सिक्युरिटी एडीजी रघुवीर लाल, झोनचे एडीजी पीयूष मोरदिया, अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाळ, अयोध्येचे आयजी प्रवीण कुमार यांच्यासह अयोध्या जिल्ह्याचे डीएम, एसपी, सीआरपीएफ आणि पीएसीसह सुरक्षा विभागाशी संबंधित इतर अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. 22 जानेवारी रोजी प्रस्तावित प्राणप्रतिष्ठा महोत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्था कडेकोट करणे आणि ठेवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय मंदिराच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही चर्चा झाली.
सुरक्षा बळकट करण्यासाठी 40 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर : बैठकीबाबत बोलताना अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाल म्हणाले की, येत्या काही दिवसांत अयोध्येत मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आलीय. अयोध्येतील सुरक्षेशी संबंधित कामांमुळं स्थानिक लोकांची आणि अयोध्येत येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. अयोध्येची सुरक्षा बळकट करण्यासाठी 40 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करुन विविध कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासह अन्य सुरक्षा व्यवस्थांबाबतच्या प्रस्तावावर चर्चा झालीय. अयोध्येची सुरक्षा आधीच अत्यंत कडेकोट असून त्यात आणखी काही बदल करण्याबाबत चर्चा झालीय. 22 जानेवारीचा कार्यक्रम संपूर्ण सुरक्षेसह भव्य पद्धतीनं पार पाडण्याचा आमचा उद्देश असून सर्व अधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेतल्याचं अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाल म्हणाले.