नवी दिल्ली : सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असणारे उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या एका नव्या ट्विटची आता चांगलीच चर्चा होत आहे. या ट्विटमधून महिंद्रा यांनी श्रीमंतीच्या प्रदर्शनावर टीका केली आहे. श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी पैसे खर्च करणे योग्य नाही असे परखड मत आनंद महिंद्रा यांनी या ट्विटमधून व्यक्त केले आहे.
पैसे असे खर्च करू नये
सोन्याचा मुलामा असलेल्या एका फेरारी कारचा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर ही कार अमेरिकेतील एका भारतवंशीयाची असल्याचे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रांनी यावर नाराजी व्यक्त करणारे कॅप्शन दिले आहे. "मला माहिती नाही हे सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे. खरं म्हणजे हा एक धडा आहे, की तुम्ही श्रीमंत असताना तुमचे पैसे कसे खर्च नाही केले पाहिजे" असे कॅप्शन महिंद्रांनी याला दिले आहे.