होशियारपूर (पंजाब) :अमृतपाल सिंग पंजाबमधून दिल्लीत पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर, तो आता पंजाबमध्ये परतल्याची माहिती समोर आली आहे. त्या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांनी त्याचा होशियारपूरमध्ये शोध सुरू केला. मंगळवारी रात्री उशिरा, होशियारपूरच्या मनरायान गावाला पंजाब पोलिसांच्या 700 हून अधिक जवानांनी वेढा घालत सर्वत्र बॅरिकेड्स लावले. काउंटर इंटेलिजन्सनुसार, अमृतपाल आणि त्याचे साथीदार इनोव्हा कारमध्ये असल्याचा संशय होता. त्यांनी ही इनोव्हा कार मनरायाना गावातील भाई चंचल सिंग गुरुद्वाऱ्याजवळ सोडून पळ काढला आहे.
पोलिसांनी संपूर्ण गावाची झडती घेतली : माहितीनुसार, होशियारपूरच्या फगवाडा रोडवर फगवाड्याकडून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. ते पाहताच चालकाने गाडी बायपासजवळील मनरायान गावात वळवली. त्यानंतर पोलिसांनी फगवाडा ते होशियारपूर या कारचा पाठलाग केला. कारमधील चार जण मनरायन गावातील गुरुद्वारा साहिबमध्ये पोहोचले आणि त्यांनी गाडी तेथेच सोडून तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी गावात शोधमोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कोणालाही गावात प्रवेशावर बंदी घातली. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी गावातील प्रत्येक घराची झडती घेतली.