चंदीगड : पंजाब सरकारने शनिवारी कट्टरपंथी धर्मोपदेशक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आणि सिंह यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या 78 सदस्यांना अटक केली. दरम्यान, अमृतपाल सिंह याच्या ताफ्याला जालंधर जिल्ह्यात थांबवण्यात आले, मात्र तो पोलिसांना चकमा देऊन पळाला. अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी सुरक्षा कडक केली असून रविवार दुपारपर्यंत राज्यात इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित केली आहे.
आतापर्यंत 78 जणांना अटक : पोलिसांनी सांगितले की, त्यांनी सिंह याच्या नेतृत्वाखालील वारिस पंजाब दे (WPD) शी संबंधित लोकांविरुद्ध मोठी राज्यव्यापी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. सिंह याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान आतापर्यंत एकूण 78 जणांना अटक करण्यात आली आहे, तर अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, अमृतपाल सिंह आणि इतर काही जण फरार असून त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांची ही कारवाई अमृतपाल सिंह याची मुक्तसर जिल्ह्यातून 'खालसा वाहिर' या धार्मिक मिरवणुकीच्या एक दिवस आधी सुरु झाली. अमृतसरमधील जल्लूपूर खेडा या त्याच्या मूळ गावी सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वडिलांचा पोलिसांना सवाल : अमृतपालचे वडील तरसेम सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्या मुलाला अटक झाली आहे की नाही, याची माहिती नाही. तरसेम यांनी सांगितले की, त्यांनी पोलिसांना सहकार्य केले आहे. मात्र त्यांनी पोलिसांची कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगून त्यांचा मुलगा तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. गुन्हेगार आणि अंमली पदार्थात गुंतलेल्यांवर पोलिस कारवाई का करत नाहीत, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
पोलिसांची राज्यव्यापी कारवाई : 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंह याच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, पोलिस त्यांचा पाठलाग करत आहेत. एका व्हिडिओमध्ये अमृतपाल एका वाहनात बसलेलाही दिसतो आणि त्याचा एक सहकारी पोलीस अमृतपालच्या मागे असल्याचे सांगत असल्याचे ऐकू येते. पोलिसांच्या राज्यव्यापी कारवाईत आतापर्यंत एक 315 बोअर रायफल, सात 12 बोअर रायफल, एक रिव्हॉल्व्हर आणि 373 काडतुसे यासह नऊ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
पंजाब हाय अलर्टवर : पंजाबमध्ये अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, डब्ल्यूपीडीशी संबंधित लोक वेगवेगळ्या वर्गांमधील वैर वाढवणे, खुनाचा प्रयत्न करणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सार्वजनिक सेवकांना त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे या चार गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेले आहेत. ते म्हणाले की, 24 फेब्रुवारी रोजी अजनाळा पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी डब्ल्यूपीडीच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.