नवी दिल्ली :'मणिपूरमध्ये हिंसा झाली मान्य आहे. झालेली घटना लाजिरवाणी आहे. मात्र यावर राजकारण करणे हे अधिक लाजिरवाणे आहे', असा घणाघात अमित शाह यांनी केला. हे सरकार मणिपूरवर चर्चेला तयार नाही, असे खोटे पसरवण्यात आले. मात्र आम्ही मणिपूरवर चर्चेसाठी केव्हाही तयार असल्याचे अमित शाहांनी स्पष्ट केले. 'मणिपुरात ६ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे. सहा वर्षांत ३ मे पर्यंत एकही दिवस कर्फ्यू लागला नाही. मणिपूर एकही दिवस बंद राहिले नाही', असे ते म्हणाले.
मणिपूरवर सतत मोदींशी चर्चा केली : 'विरोधक म्हणतात की मोदींना मणिपूरची पर्वा नाही. मात्र 3, 4 आणि 5 मे रोजी पंतप्रधान सतत सक्रिय होते. 3 मे रोजी तेथे हिंसाचार सुरू झाला. पहाटे 4 वाजता मोदींनी माझ्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पुन्हा फोन करून माझ्याशी चर्चा केली. आम्ही तीन दिवस सतत काम केले. 16 व्हिडिओ कॉन्फरन्स केल्या', असे अमित शाह म्हणाले.
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना का हटवले नाही : मणिपुरात एवढा हिंसाचार होऊनही मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना का हटवले नाही, या प्रश्नाचे उत्तरही अमित शाह यांनी दिले. 'विरोधक म्हणतात की राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू करण्यात आली नाही. हिंसाचाराच्यावेळी जेव्हा राज्य सरकार सहकार्य करत नाही, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. मात्र आम्ही डीजीपी बदलले, ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. आम्ही मुख्य सचिव बदलले, ते देखील त्यांनी मान्य केले. जेव्हा मुख्यमंत्री सहकार्य करत नाहीत तेव्हा राष्ट्रपती राजवट आणावी लागते', असे स्पष्टीकरण अमित शाह यांनी दिले.
अधिवेशनाच्या एक दिवस आधी व्हिडिओ व्हायरल का झाला : 'संसद अधिवेशनाच्या एक दिवस आधी नग्न महिलांच्या धिंडीचा व्हिडिओ व्हायरल का झाला', असा सवालही शाह यांनी केला. 'कोणाकडे हा व्हिडिओ आला तर तो आधीच डीजीपींना द्यायला हवा होता. आरोपी आधीच पकडले गेले असते', असे अमित शाह म्हणाले. 'मला मैतेई आणि कुकी समुदायांना सांगायचे आहे की, हिंसाचाराने नव्हे तर संवादातून तोडगा काढा', असे अपील अमित शाहांनी यावेळी केले.
हेही वाचा :
- Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींचा लोकसभेत फ्लाइंग किस? स्मृती इराणी बरसल्या...
- Manipur violence : मणिपूर हिंसाचार प्रकरणी 3 माजी महिला न्यायाधीशांची समिती प्रस्तावित, पडसलगीकर ठेवणार देखरेख?
- Manipur Violence : 'मन की बात' नको, 'मणिपूर की बात' करा; 11 वर्षीय मुलीची पंतप्रधान मोदींना साद