नवी दिल्ली Amit Shah PoK :गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना, पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे उद्भवला असल्याचा आरोप केला. यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे. शाह यांनी थेट असा आरोप केल्यानंतर काँग्रसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी त्यांना चर्चेचं आव्हान दिलं. अमित शाह यांनी देखील, सरकार या मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
फारुख अब्दुल्ला यांचं प्रत्युत्तर : आता अमित शाह यांच्या या टीकेला जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिलंय. "काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात जायलं हवं, असं तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सुचवलं होतं", असं ते म्हणाले. "पुंछ आणि राजौरी भागाला वाचवण्यासाठी भारतीय सैन्याला आताच्या पीओकेमधून वळवण्यात आलं होतं. असं जर केलं नसतं, तर हे दोन भागही पाकिस्तानात गेले असते. यावर तेव्हा आणखी काही पर्याय नव्हता", असं फारुख अब्दुल्ला यांनी सांगितलं.
पाकव्याप्त काश्मीरसाठी २४ जागा राखीव : लोकसभेत बुधवारी (६ डिसेंबर) 'जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक' आणि 'जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक' या विधेयकांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी एक मोठी घोषणा केली. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत पाकव्याप्त काश्मीरसाठी २४ जागा राखीव ठेवल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांना जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठी १ जागा आणि जम्मू-काश्मीरमधून देशभरात विस्थापित झालेल्या लोकांसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं.
जम्मू-काश्मीर विधानसभेतील जागांचं पुनर्गठन :जम्मू-काश्मीर विधानसभेतील जागांचं पुनर्गठन करण्यात आलंय. जम्मूतील जागा ३७ वरून वाढून आता ४३ झाल्या आहेत. तर काश्मीरमधील जागा ४६ वरून वाढून ४७ केल्या गेल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत पूर्वी १०७ जागा होत्या. आता त्यांची संख्या वाढून ती ११४ एवढी झाली आहे.
हे वाचलं का :
- "पाकव्याप्त काश्मीर नेहरूंची चूक, कलम ३७० आधीच हटवायला हवं होतं", अमित शाह यांचा लोकसभेतच आरोप