अहमदाबाद -कोरोना कालावधीत कडक निर्बंधादरम्यान ओडिशातील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथची रथयात्रा निघाली आहे. अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. भगवान जगन्नाथ यांची ही 144 वी वार्षिक रथयात्रा आहे.
कोरोना संकटामुळे यंदाही भाविकांना यात्रेत भाग घेण्याची परवानगी नाही. केवळ मंदिराच्या आवारातच काही लोकांना हजर राहण्याची परवानगी दिली आहे. सोमवारी सकाळी अहमदनगरमध्ये जगन्नाथ यात्रा सुरू झाली. यावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सोन्याच्या झाडूने भगवान जगन्नाथांच्या रथाची साफसफाई केली. अहमदाबादच्या ज्या मार्गावरून रथ यात्रा जात आहे. त्या मार्गावर कर्फ्यू लावण्यात आला आहे.
अहमदाबादमधील जगन्नाथ रथ यात्रेचा संपूर्ण मार्ग सुमारे 13 किमी आहे. सर्वसाधारणपणे हा प्रवास पूर्ण होण्यास 10 तास लागतात. परंतु कोविड कालावधीत कोणतेही भक्त नसल्यामुळे रथयात्रा 4 ते 5 तासांत पूर्ण होईल. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. गेल्या वर्षीही अमित शाह यांनी जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली होती.
रथयात्रेतील प्रत्येक व्यक्तीला आरटीपीसीआरचा नकारात्मक अहवाल दर्शविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. रथयात्रेमध्ये भाग घेणार्या प्रत्येक व्यक्तीस मास्क घालावा लागेल आणि शारीरिक अंतराच्या नियमांचे देखील पालन करावे लागेल.
गेल्या वर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने रथ यात्रा काढण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर जमालपूर परिसरातील भगवान जगन्नाथ मंदिरात रथयात्रेचे प्रतीकात्मक आयोजन करण्यात आले होते. पारंपारिकरित्या, रथ यात्रा सकाळी 7 वाजता भगवान जगन्नाथच्या मंदिरातून निघते आणि रात्री 8 वाजेपर्यंत 400 वर्ष जुन्या मंदिरात परत येते. कोरोना महामारीच्यापूर्वी लाखो लोक या जगप्रसिद्ध रथयात्रेमध्ये भाग घेत असत.