जम्मू - मागील दोन वर्षे अमरनाथ यात्रा ( Pilgrimage To Amarnaath ) कोरोनाच्या प्रभावामुळे स्थगित करण्यात आली होती. यावर्षी मोठ्या उत्साहात भाविक यात्रेसाठी येऊ लागले होते. मात्र, शुक्रवारी अमरनाथ गुहेजवळ ( Amarnath Cave ) ढगफुटी झाल्यामुळे 30 जूनपासून सुरू झालेली ही अमरनाथ यात्रा ( Pilgrimage To Amarnaath ) थांबवण्यात आली होती. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दोन दिवस थांबविण्यात आलेली यात्रा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 4026 यात्रेकरू जम्मूवरून अमरनाथ यात्रेला रवाना झाले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कडेकोट बंदोबस्तात हे भाविक रवाना झाले आहेत.
4026 भाविक रवाना -"केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कडेकोट बंदोबस्तात येथील भगवती नगर यात्री निवास येथून 110 वाहनांमधून एकूण 4,026 यात्रेकरूंची 12वी तुकडी निघाली," असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भाविकांमध्ये ३ हजार १९२ पुरुष, ६४१ महिला, १३ मुले, १७४ साधू आणि सहा साध्वी आहेत. ते म्हणाले की बालटाल बेस कॅम्पला जाणारे 1,016 यात्रेकरू 35 वाहनांमधून पहाटे 3.30 वाजता निघाले होते. यानंतर 2,425 यात्रेकरूंना घेऊन 75 वाहनांचा दुसरा ताफा काश्मीरमधील पहलगाम कॅम्पसाठी रवाना झाला.