लखनौ Muslim Women Right In Property :ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वर्किंग कमिटीनं शनिवारी (9 डिसेंबर) ऐशबाग येथील दारुल उलूम फरंगी महाली हॉलमध्ये शरियत परिषद घेतली. यामध्ये वडिलांच्या वारसाहक्कात मुलींना वाटा देण्याबाबत चर्चा झाली. शरिया कायद्यानुसार मुलीला वडिलांच्या वारसामध्ये निश्चित वाटा दिला जातो, असं अनेक लोक मानतात. परंतु अनेकवेळा मुलींना हा वाटा मिळत नाही. तसंच यावेळी मुस्लिमांनी त्यांच्या मुलींना संपत्तीत वाटा द्यावा, असं आवाहनही करण्यात आलं.
इस्लाम धर्मात महिलांना मोठं महत्त्व :ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत दारुल उलूम फरंगी महल येथे तफहीम-ए-शरियत परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आशिफ अहमद बस्तवी अध्यक्षस्थानी होते. कुटुंब उभारणीत महिलांची भूमिका या विषयावर त्यांनी भाष्य केलं. परिषदेचं उद्घाटन मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांच्या हस्ते झालं. यावेळी मौलाना अतीक अहमद बस्तवी म्हणाले की, इस्लाम धर्मात महिलांना मोठं महत्त्व, सन्मान व अधिकार दिलेले आहेत. घर सांभाळण्याची जबाबदारी फक्त महिलेची आहे. त्याचं संपूर्ण मार्गदर्शन इस्लामी शरियतनं दिलंय. जर आपण सर्वांनी या सूचनांचं पालन करण्यास सुरुवात केली तर आपल्या घरातील अस्वस्थता संपेल अन् आपली घरं स्वर्ग बनतील.
वैयक्तिक कायदे पाळण्याचे घटनात्मक स्वातंत्र्य : मौलाना खालिद रशीफ फरंगी महाली यांनी सांगितलं की, 1973 मध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची स्थापना झाली. ही भारतीय मुस्लिमांची संस्था असून त्याचं मूळ उद्दिष्ट शरियत आणि मुस्लिम समाजाची एकता राखणे आहे. सर्व धर्मांच्या अनुयायांना त्यांचे वैयक्तिक कायदे पाळण्याचे घटनात्मक स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही हे अधिकार आणि विशेषाधिकार आहेत. तसंच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा पाया कुराण करीम आणि हदीस पाक आहे, हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी संबंधित लोकांमधील गैरसमज दूर करणं हा या परिषदेचा उद्देश असल्याचही ते म्हणाले.