नवी दिल्ली :भारत यंदा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. भारताला सध्या या बैठकीचे अध्यक्षपद आहे. बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आणि उच्च अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्घाटनाचे भाषण करणार आहेत. एससीओच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत चीन आणि पाकिस्तान देखील सहभागी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही देशाचे प्रतिनिधी या बैठकीत ऑनलाइन माध्यमातून सहभागी होणार आहेत.
रशियाचा देखील सहभाग : रशियन सुरक्षा परिषदेच्या माहितीनुसार, रशियन फेडरेशनच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव्ह हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. यानंतर एससीओची पुढील महत्वाची बैठक 27 ते 29 एप्रिल दरम्यान संरक्षण मंत्र्यांमध्ये होणार आहे. ही बैठकही दिल्लीतच होणार आहे. संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर 4 आणि 5 मे रोजी गोव्यात परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत एससीओ सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत.