नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर मागील दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पास केलेले तीन कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. येथील सर्व शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था एक मोठं आव्हान आहे. यावर उपाय म्हणून आता चपाती तयार करण्याची यंत्रे आंदोलन स्थळी आणण्यात आली आहेत.
जेवण जलद बनविण्याची सोय
ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी दिल्ली सीमेवरील आंदोलनाचे वार्तांकन करत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी चपाती तयार करणारी यंत्रे दिसून आली. हे मशीन तासाला सुमारे ९०० चपात्या तयार करू शकते. त्यामुळे जेवण जलद तयार करणे शक्य झाले आहे. हजारो आंदोलकांना जेवण पुरवण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली आहे. पंजाब हरयाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी बरोबर येताना ट्रक आणि टेम्पोमधून धान्य सोबत आणले आहे.