नवी दिल्ली : उत्तरेकडील भारत आणि चीनच्या सीमावादाला आणि त्यातून उद्भवलेल्या भारत- चिनी सैनिकांमधील संघर्षाला आता दोन वर्षे झाली आहेत. मे 2020 मध्ये हा वाद सुरू झाला. तर महासत्ता रशिया आणि माजी सोव्हिएत युनियनचा सदस्य राहिलेल्या युक्रेन यांच्यातील संघर्ष 24 फेब्रुवारी रोजी सुरु झाला आहे. लडाखमधील लष्करी अडथळे आणि युक्रेन संघर्षाचे अद्याप निराकरण झालेले नाही. प्रदीर्घ काळ चालणारे वाद आता रूप बदलत आहेत. त्यामुळे भारतीय लष्करी आस्थापनेने देखील भविष्यातील सर्व युद्धे लहान, तीव्र आणि जलद असतील, हे तत्व स्वीकारले आहे.
भारताच्या लष्करी आस्थापनेने 2017 मध्ये तयार केलेल्या जॉइंट डॉक्ट्रीन ऑफ इंडियन आर्म्ड फोर्सेस (JDIAF) वर पुनर्विचार करू शकेल असा विचार करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराच्या सात कमांडपैकी एक विभाग सध्या सुरू असलेल्या रशिया - युक्रेन संघर्षांचा तपशीलवार अभ्यास करत आहे.
गुरुवारी, भारतीय वायुसेनेचे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी 'लॉजिसेम वायू-२०२२' या लॉजिस्टिक्सवरील चर्चासत्रात यावर लक्ष वेधले. “दल, अवकाश आणि वेळेतले सातत्य यामध्ये आम्हाला तयारी करण्याची गरज असेल. लहान वेगवान युद्धे तसेच पूर्व लडाखमध्ये आपण पाहत असलेल्या प्रदीर्घ संघर्षासाठी तयार रहा, असे ते यावेळी म्हणाले.