नवी दिल्ली -देशात कोरोनाचा कहर आहे. दररोज 40 ते 45 हजार नव्या रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरी तिसऱ्या लाटेचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. देशात कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळले होते. आता देशात ‘कप्पा’ व्हेरिएंट आढळला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लसनंतर भारतात आता ‘कप्पा’ व्हेरिएंट आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
उत्तर प्रदेशमधील संत कबीर जिल्ह्यातील मेहदावल येथे ६५ वर्षीय व्यक्तीचा कप्पा या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे मृत्यू झाला आहे. कप्पा व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. कप्पा व्हेरिएंट आढळल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची डोकेदुखी वाढली आहे. कप्पा व्हेरिएंट यापूर्वी यूके आणि यूएसमध्ये आढळला असून तीथे या व्हिरिएंटने कहर माजवला आहे. त्यामुळे कप्पा व्हेरिएंटच्या भारतातील प्रवेशाने आणखी एक संकट उभं राहिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटचं नामकरण केलं होते. सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जातो आहे. डेल्टा व्हेरिएंट कप्पा व्हेरिएंटच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेने 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या कोरोनाच्या प्रसार कमी करण्यासाठी वेळेवर व जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आवाहन सर्व राज्यांतील नागरिकांना केले आहे. तसेच बचावासाठी लसीकरण करावे, असेही सरकारने म्हटलं आहे.
लॅम्बडा व्हेरिएंट -
कोरोनाचे विविध व्हेरिएंट येत असून कप्पा, डेल्टा, डेल्टा प्लसनंतर लॅम्बडा व्हेरिएंटदेखील आढळला आहे. हा डेल्टा प्लस व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार सध्या जगभरातील 30 देशांमध्ये झाला आहे. भारतात मात्र अद्याप या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडला नसल्याचं वृत्त आहे. या व्हेरिएंटला C.37 असं नाव देण्यात आलं असून याचा उगम आफ्रिकेतल्या पेरु या देशात झाल्याचं सांगण्यात येतंय. व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.