नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला बरेच महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही या प्रकरणात नवनवीन गोष्टी उघडकीस येत आहेत. या प्रकरणात, फिर्यादीने आता ऑनलाइन समुपदेशन सत्रादरम्यान श्रद्धाने आफताबसोबत केलेल्या संभाषणाचा ऑडिओ न्यायालयात शेअर केला आहे. श्रद्धाने ऑनलाइन समुपदेशनादरम्यान मानसोपचार तज्ज्ञांना सांगितले होते की, तिचा प्रियकर तिला वारंवार हत्येची धमकी देत आहे.
आफताबने श्रद्धाला अनेकदा मारहाण केली : ऑडिओमध्ये आफताब असे म्हणताना ऐकू येत आहे की, तो असा व्यक्ती नाही ज्याला हे करण्याची इच्छा आहे. मात्र, हेल्थकेअर अॅपवर समुपदेशन सत्र कोणी बुक केले आणि हे सत्र श्रद्धाच्या हत्येच्या किती दिवस आधी झाले होते, हे ऑडिओ क्लिपद्वारे स्पष्ट झालेले नाही. श्रद्धा आणि आफताबच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की त्याने तिला अनेकदा मारहाण केली होती. तसेच त्याने तिला एकदा बेशुद्धही केले होते. 34 मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये श्रद्धा समुपदेशकाला सांगताना ऐकू येत आहे की, आफताबने मला किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला हे मला माहीत नाही. त्याने मला या आधीही मारण्याचा प्रयत्न केला आहे.
वारंवार बोलण्याची विनंती केली : यावेळी तिने असेही सांगितले की, त्याने ज्या प्रकारे माझी मान पकडली होती, त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार झाला होता. मला ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ श्वास घेता येत नव्हता. सुदैवाने त्याचे केस ओढून मी माझा बचाव करू शकले. श्रद्धाने आफताबला तिला मारण्याची इच्छा असल्याचे नमूद केले आहे. श्रद्धाने त्याला पुन्हा सांगितले की, मी तुला विनंती करते की मला मारू नको. आपण बोलू. मी तुला दोन वर्षांपासून माझ्याशी बोलायला म्हणते आहे.
आफताबचा कल श्रद्धाला मारण्याकडे : समुपदेशनासाठी तीन सत्रे बुक करण्यात आली होती. त्यापैकी एक रद्द करण्यात आले. विशेष सरकारी वकील अमित प्रसाद आणि मधुकर पांडे यांनी दिल्ली पोलिसांची बाजू मांडताना सांगितले की, हा खटला प्रत्यक्ष किंवा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे की नाही हे महत्त्वाचं नाही. आफताबचा कल तिला मारण्याकडे असल्याचे श्रद्धाने समुपदेशकाला सांगितले. एसपीपी प्रसाद यांनी न्यायालयाला सांगितले की, ही स्पष्टपणे आक्षेपार्ह परिस्थिती आहे, जी विश्वसनीय आणि खात्रीशीर पुराव्यांद्वारे समोर आली आहे. याद्वारे कलम 302 (खून) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब होणे किंवा गुन्हेगाराने खोटी माहिती देणे) अंतर्गत गुन्ह्यांसाठी आरोपीच्या अपराधाबद्दल निष्कर्ष काढला येतो.
न्यायालयात अनेक पुरावे सादर : फिर्यादीच्या वकिलांनी श्रद्धाचे तीन मोबाईल न्यायालयात सादर केले आहे. तिचे दोन बँक खाते आणि क्रेडिट कार्डमधील व्यवहारांचे पुरावेही त्यांच्याकडे आहेत. दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी सांगितले की, त्यांना हाडे, जबड्याचे तुकडे आणि रक्ताचे अंश सापडले आहेत, जे श्रद्धाचे असल्याचे ओळखले गेले आहे. डीएनए प्रोफाइलिंग वापरून रक्त जुळले, जबडा दंतचिकित्सकाद्वारे ओळखला गेला आणि हाडांवर करवतीच्या वापराची एम्सने पुष्टी केली आहे. फिर्यादीने सांगितले की, आफताबने रेफ्रिजरेटर, सॉ ब्लेड, पाणी, क्लिनर आणि अगरबत्ती खरेदी केली होती. श्रद्धा या आधी अंगठी घालून दिसली होती, जी आफताबने दुसऱ्या महिलेला दिली असावी. नंतर, महिलेने तपासकर्त्यांसमोर अंगठी सादर केली. त्याचवेळी आफताबची बाजू मांडणारे वकील जावेद हुसेन यांनी युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांच्या न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २५ मार्चपर्यंत तहकूब केली.
हेही वाचा :Thane Crime News: नवी मुंबईतील 'त्या' बिल्डरच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या