मुंबई : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा ( UP Assembly Election 2022 ) प्रचार रंगात आलेला असताना आता उत्तरप्रदेशच्या राजकारणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची 'एन्ट्री' होणार आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेणार ( Aaditya Thackeray Rallies In UP ) आहेत. २४ फेब्रुवारी रोजी या दोन्ही सभा घेण्यात येणार असून, शिवसेनेने याबाबत जोरदार तयारी चालवली आहे.
'अबकी बार, तीर कमान'चा नारा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. राऊत ट्विटमध्ये म्हणाले की, 'शिवसेना नेते व महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे २४ फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशच्या निवडणूक दौऱ्यावर जात आहेत. ते सकाळी ३०६- डुमरियागंज विधानसभा ( सिद्धार्थनगर ) आणि सायंकाळी २६५- कोरांव विधानसभा ( जिल्हा प्रयागराज ) येथील शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत'. राऊत यांनी ट्विटमध्ये #अबकी_बार_तीर_कमान असा नाराही दिला आहे.
आदित्यंच्या निशाण्यावर भाजप
गोव्यामध्ये प्रचारसभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशातही आदित्य यांचा रोख हा भाजपवरच असणार आहे. शिवसेना आणि भाजप दरम्यान सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा प्रभाव आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. भाजप उमेदवार अडचणीत असल्याचे सांगितले जात असलेल्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेत जोर लावला आहे. त्यामुळे या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.