नवी दिल्ली Accident on Delhi Jaipur Highway : दिल्ली जयपूर महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. दिल्ली जयपूर महामार्गावरील गुरुग्राममधील सिद्रावली गावाजवळ शुक्रवारी रात्री तेलाच्या टँकरनं कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
धडक दिल्यानंतर कार जळून खाक : बिलासपूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरहून येणाऱ्या तेलाच्या टँकरनं दुभाजक तोडून कारला धडक दिली. कारमधील प्रवासी जयपूरला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कारमधील सीएनजी सिलेंडरमुळं कारला भीषण आग लागली आणि काही वेळातच कार जळून खाक झाली. टक्कर झाल्यानंतर आग लागल्यामुळं तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाला. कारला धडक दिल्यानंतर ऑइल टँकरची महामार्गावरील पिकअप व्हॅनला धडक बसली, त्यामुळं त्या व्हॅन चालकाचाही जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
प्रकरणाचा पुढील तपास सुरु : "दिल्ली-जयपूर महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा आम्ही पाहिलं की एक कार जळून राख झाली होती आणि तीन लोकांचा मृत्यू झाला होता", असं तपास अधिकारी विनोद कुमार म्हणाले. पिकअप व्हॅनची एका ऑइल टँकरला टक्कर झाली. त्यामुळं व्हॅनचा चालकही जागीच मरण पावला. मात्र, ऑइल टँकरचा आरोपी चालक पळून गेला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचंही तपास अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितलंय.
पश्चिम बंगालमध्ये बसला आग : पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री एका लक्झरी बसला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला. तर या अपघातात अन्य 30 जण जखमी झाले आहेत. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली. अपघातग्रस्त बस कोलकाताहून ओडिशातील पारादीपकडं जात होती. या अपघातात होरपळल्यानं एकाचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मृत व्यक्तीची ओळख पटवली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग 16 वर हा अपघात घडलाय. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आगीची माहिती मिळताच बसमधील काही प्रवाशांनी वाहनातून उड्या मारल्या, यामुळं अनेक जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र बसला आग लागण्याचं कारण समजू शकलेलं नाही.
हेही वाचा :
- Accident On Pune Bangalore Highway : ट्रेलरनं टेम्पोला चिरडलं; पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार
- Mumbai Accident : सुरतहून मुंबईला आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा मृत्यू
- Accident on Bandra Worli Sea Link : वांद्रे वरळी सी लिंकवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ