नवी दिल्ली : मुंबईत होणाऱ्या विरोधी एकता आघाडीच्या (इंडिया) तिसऱ्या बैठकीत आम आदमी पक्ष सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी याला दुजोरा दिला. केजरीवाल यांना 'इंडिया' बैठकीत सहभागी होण्याबाबत विचारले असता, 'मी मुंबईला जाईन आणि तेथे जी काही रणनीती बनेत, ती तेथून आल्यानंतर शेअर करेन', असे ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात वाद झाला होता : गेल्या आठवड्यात दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर 'आप'च्या वतीने सांगण्यात आले होते की, आगामी निवडणुकीत जागावाटप होणार नसेल, तर मग विरोधी आघाडीचा अर्थ काय? यानंतर आम आदमी पक्ष विरोधी पक्ष एकता आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
काँग्रेसकडून युती न करण्याचे संकेत होते : 16 ऑगस्ट रोजी दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी दिल्लीत लोकसभा निवडणूक युती न करता लढण्याचे संकेत दिले होते. पक्षाच्या हायकमांडकडून तशा सूचना आल्याचे सांगण्यात आले. यावरून आम आदमी पक्ष संतापला. याला उत्तर देताना, 'जेव्हा दिल्लीत युती होऊ शकत नाही, तेव्हा 'इंडिया' आघाडीला काहीच अर्थ नाही', असे 'आप'च्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या होत्या.