विजयपूर : आपल्या 21 वर्षीय नातवाला किडनी देऊन 73 वर्षीय आजीने त्याला जीवदान दिले आहे. नातवासाठी आजी देवदूत ठरल्याची ही घटना कर्नाटकातील विजयपूर शहरात घडली. शहरातील यशोदा रुग्णालयात किडनीरोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. आजीने किडनी दान करुन नातवाचे प्राण वाचवल्याने आजीचे कौतुक करण्यात येत आहे.
आई बाबा आजारी त्यात नातवाची किडनी झाली फेल :बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी येथील सचिन हा तरुण गेल्या 18 वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. मात्र मागच्या काही दिवसात त्याची किडनी फेल झाल्याने त्याला आठवड्यातून दोन वेळेस डायलिसीस करण्यासाठी नेण्यात येत होते. सचिनची घरची परिस्थिती अतिशय हलाखिची आहे. तर त्याचे आई वडील दोघेही आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्याच्या 73 वर्षाच्या आजी उद्धवाने पुढे येत सचिनला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. उद्धवाच्या एका किडनीदानामुळे सचिनचा प्राण वाचला आहे.
किडनी ट्रान्सप्लांटची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी :बेळगाव जिल्ह्यात अवयव दानाच्या घटना खूप विरळ आहेत. त्यातही विजयपूर येथील यशोदा रुग्णालयात नव्यानेच किडनी ट्रान्सप्लांट करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सचिनला त्याच्या 73 वर्षीय आजी उद्धवा यांनी जेव्हा किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा यशोदा रुग्णालयात त्यांची किडनीरोपण करण्याचे ठरवण्यात आले. यशोदा रुग्णालयाचे डॉक्टर रविंद्र मडकरी यांनी सचिन आणि त्याच्या आजीची तपासणी केली. त्यानंतर डॉ रविंद्र मडकरी यांनी सचिनवर किडनीरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. सध्या 73 वर्षीय आजी उद्धवा आणि सचिन या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉ रविंद्र मडकरी यांनी दिली. यशोदा रुग्णालयात झालेल्या पहिलीच किडनीरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने या रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक करण्यात येत आहे.