पणजी (गोवा) - विज्ञान व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जाणकारांनी आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे सेवन योग्य आरोग्य चिकीत्सा न करता केल्यास अपायकारक ठरू शकते, असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या सुमारे 22 कोटी 50 लाखांच्या गोळ्या खरेदीत घोटाळा केला असल्यानेच दोघेही आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याबाबत गप्प आहेत. तर, गोव्यातील स्वार्थी भाजप सरकारने आजाराचा बाजार मांडला आहे, असा आरोप गोवा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
आयव्हरमेक्टिन गोळ्या गोव्यात फ्री वाटल्या जाणार -
गोवा राज्यातील 18 वर्षे झालेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात सध्या उशीर होत असल्यामुळे त्याऐवजी आयव्हरमेक्टीन या गोळ्या देण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या गोळ्या गोव्यात फ्री वाटल्या जाणार असल्याचेही म्हटले आहे. अठरा वर्षांवरील सर्वांना पाच दिवस घेण्यासाठी आयव्हरमेक्टीन या 12 मिलीग्रॅमच्या कोरोना रोग प्रतिबंधक गोळ्या देण्यात येणार आहेत. इटली, युके, जपान, स्पेन येथील तज्ज्ञांनी या गोळ्यांच्या उपचाराची शिफारस केलेले आहे. या गोळ्या वाटप करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचा दावाही विश्वजित राणे यांनी केला आहे.
गोळ्या कोविड प्रतिबंधक लसी एवढ्या परिणामकारक नाही मात्र -
आयव्हरमेक्टीन या गोळ्या सलग पाच दिवस घ्यायच्या आहेत आणि त्या सरकारच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल तेव्हा मिळेल, त्यापूर्वी त्यांनी या गोळ्या घ्याव्यात. असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डॉक्टरांचे पथक व इतरांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या गोळ्या कोविड प्रतिबंधक इंजेक्शन एवढ्या परिणामकारक नसल्या तरी कोविड प्रतिबंधक शक्ती वाढवणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांनी घ्याव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.